19 May, 2010

माझी कविता


येते कानावर शीळ
ध्यानीमनीही नसता
माझ्या मनाच्या अंगणी
गाते वेल्हाळ कविता

घेती काळजाचा ठाव
तिच्या सुरेल लकेरी
पाय रोकड्या शब्दांचे
पंख अर्थाचे सोनेरी

तिची उफराटी तर्‍हा
जगावेगळीच रीत
नाही येण्याला कारण
नाही जाण्याला गणित

तिच्यासाठी जोपासावे
नाते एकेक हिरवे
मुक्या कळ्यांनी करावी
रोज ऋतूंची आर्जवे

तिला द्यावयास झोका
फांदी फांदी आसुसावी
तिची वाट पहाताना
पळे युगेच भासावी

अंती सोडावा निःश्वास
जेव्हा निराश होऊन
पंख हिचे झळाळावे
तोच निःश्वास लेवुन

हिच्यासाठी साठवावा
हिर्‍यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा

असे वेडे हे पाखरू
कधी अवचित येते
त्याच्या मंजूळ नादाने
पुन्हा नादावून जाते..

No comments: