19 May, 2010

तू माझ्यात


तुझे मुक्त अस्तित्व गात्रांत माझ्या
तुझा गंध, बेधुंद श्वासांत माझ्या ..
तुला ठेविले मी जरी काळजात
सखे तु उतरलीस प्राणांत माझ्या ..
जरी पेंगला चंद्र गगनात राणी
तुझे स्वप्न जागेच डोळ्यांत माझ्या ..
तृषा भागली ना अजूनी मनाची
तुझे ओठ गुंफून ओठांत माझ्या ..
मला जायचे चांदण्यांच्या महाली
तुला घेउनी बाहुपाशांत माझ्या ..
कळेना तुला मूक भाषा मनाची?
गडे शोध तू अर्थ गाण्यांत माझ्या ..

माय


कहि कविता माझी नसून प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची आहे. परंतु माझी आवडती कवीता आहे.

हंबरून वासराले चाटते जवा गाय,

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय

रे हंबरून वासराले ...................

आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,

दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,

पिठामंदी..... पिठामंदी

पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ..........

तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,

पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,

काट्या कुट्या .......... रं काट्या कुट्या

काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,

तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,

बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,

आग शिकून शान .....ग शिकून शान.....

शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...

तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,

थरथर कापे अन, लागे तीले धाप,

कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या.......

कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,

तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,

सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,

न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,

भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,

तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी

पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,

तुझ्या चरणी.........̱ग तुझ्या चरणी,

तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,

तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

हंबरून वासराले चाटते जवा गाय,

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय

रे हंबरून वासराले...................

नांत जन्मभराच



असतीस तू मूक

आणि मी बधीर

तरीही तुझ्या भावना

पोहोचल्याच असत्या

माझ्यापर्यंत

कारण तुझी स्पंदनं

जोडून गेलीत नातं

माझ्या स्पंदनांशी

कधीचं, जन्मभराचं


कोणत्या सप्तकात


एकेक पक्षी उडून जाताना

एकेक फांदी रिकामी होताना
उरतात मागे फक्त सुरांचे
काही पुंजके उदासवाणे
आणि उरांचे धपापणे केविलवाणे

जातील हळूहळू विरत
उरलेले नादही आसमंतात
मग लागेल आठवावं
गीत जीवनाचं गातात
कोणत्या सप्तकात


माझी कविता


येते कानावर शीळ
ध्यानीमनीही नसता
माझ्या मनाच्या अंगणी
गाते वेल्हाळ कविता

घेती काळजाचा ठाव
तिच्या सुरेल लकेरी
पाय रोकड्या शब्दांचे
पंख अर्थाचे सोनेरी

तिची उफराटी तर्‍हा
जगावेगळीच रीत
नाही येण्याला कारण
नाही जाण्याला गणित

तिच्यासाठी जोपासावे
नाते एकेक हिरवे
मुक्या कळ्यांनी करावी
रोज ऋतूंची आर्जवे

तिला द्यावयास झोका
फांदी फांदी आसुसावी
तिची वाट पहाताना
पळे युगेच भासावी

अंती सोडावा निःश्वास
जेव्हा निराश होऊन
पंख हिचे झळाळावे
तोच निःश्वास लेवुन

हिच्यासाठी साठवावा
हिर्‍यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा

असे वेडे हे पाखरू
कधी अवचित येते
त्याच्या मंजूळ नादाने
पुन्हा नादावून जाते..

फांदी


मौन शब्दांचे सुरू आहे अघोरी!
त्यावरी ही ढिम्म अर्थांची मुजोरी!

केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!

दुःख सामोरे मला एकेक आले...
तू मला झालीस जेव्हा पाठमोरी!

मी तुझ्या केलेच आहे ना हवाली?
का मनाची तू तरी केलीस चोरी?

वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...
सोडली माझी वही मी सर्व कोरी!

बोच काट्यांची तशी ही ओळखीची...
बाभळी जेथील या, तेथील बोरी!

आसवे का एवढी चमकून गेली?
भंगलेले स्वप्न होते का बिलोरी?

मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...
जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!


विसरुन जा तू...


विसरुन जा ते सारं काही.....

काही सांगायचे असेल तरी, सांगू नकोस,

अश्रू रहीत माझ्या मैत्रीला, तु जागवू नकोस!

काहीच ठेवले नाहीस तु माझ्यासाठी,

गरुड्झेप घातलीस तु माझ्यावरी.

तरीही मी मैत्री ठेवली तुझ्यावरी,

पण, आता मी सांगितले तरी ऐकू नकोस !

एक दिवस आपण भेटलो होतो,

एकमेकांच्या सुखःदुखात समरस झालो होतो.

आपण आपल्या मैत्रीचे गीत गात होतो,

पण, आता ते कधीच तु आठवू नकोस!

तुझ्या मैत्रीमध्ये हरवलो मी,

तुझ्यासाठी स्वतालाही विसरुन गेलो मी.

भान मात्र माझं ठेवल नाहीस तू,

पण, कधी तुझ्या समोर आलो मी, मला मात्रा पहू नकोस!

या विरहात मन माझे हरवून गेले,

शरीर माझे व्यसनात शिरले.

स्वताला व्यसनात बुडवले मी,

पण, हे उघड्या डोळ्यांनी तु पाहु नकोस!

एक दिवस मी निघुन जाईन,

या मानवांच्या दुनियेतून.

अश्रू वाहतील माझ्या मित्रांच्या नेत्रांतुन,

पण, तु तुझी नयने मात्र ओलावू नकोस!

देह माझा विसवेल या मातीत,

माझे मित्र तेथे येऊन जातील.

मला श्रध्दापुष्प वाहून जातील,

पण, मला श्रध्दांजली वाहण्यास मात्र तू विसरु नकोस.

खरच असं करशील का ?


इतकी वर्षे झाली,

आतातरी स्वप्नात येऊ नकोस.

दूर आपण झालो कधीचे

plz, आठवणींत भेटू नकोस.

झालंय ब्रेक अप तरीही,

डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.

खरेच सांगू का तुला,

माझ्या मनात तू आत राहू नकोस.

यायचे आहे तर समोर ये,

होऊ दे खरीखुरी भेट.

वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे,

असे छान सरप्राइज स्ट्रेट.

तू मलाच चुकीचं ठरवल


मला काय वाटलं;

तर तुला काय वाटलं.

चुकीचं मी तुला ठरवलं तर ;

तू मलाच चुकीचं ठरवल.

खोटे आळ वेड्या आतातरी;

माझ्यावर लावू नकोस;

वेदना होतात या मला;

तू असं दुखवू नकोस.

माझ्या डोळ्यांच्या आरशात;

जर शोभत नाहीत अश्रू;

तर छेडु नकोस मला;

असं रडवूही नकोस.

असशील तू कोणा दुसऱ्यांचा ;

कदाचीत माझा नसशीलही;

जरी हे खरं असेल तरी;

तू मला ते सांगू नकोस.

आता तरी किंमत लाव;

माझ्या तुज्यासाठीच्या स्वप्नांची;

नाहीतर कोणत स्वप्न;

मला दाखवूतरी नकोस.

आता तर आलास अन् भेटलास;

अन् ऐवढ्यातच निघालास;

फक्त एक करार पाळण्यासाठी;

नाईलाजाने मला भेटू नकोस.

सांज कलताना


काल घेतलेल्या काल
विसरल्या आणाभाका...
सांज कलताना पुन्हा
प्याले भरून दे माका..

तुझं हसणं नाचणं..
डोळा भरून पाहणं..
लटपटत्या पायांनी
माडीवर येणं जाणं...
पण कशी ही पायरी
रोज देई मला धोका.

घरी जाण्यानं उदास...
माझ्या साऱ्या आठवणी...
आज बर्फावर प्याली
नाही मिसळलं पाणी..
झुले आज मी जसा की
आमराईतला झोका..

झाला दारात तांडव...
बयो हाती सरपण...
माझं तुडवलं अंग...
माझं बांधलं सरण...
बेशुद्धीत घेतल्या मी
पुन्हा साऱ्या आणाभाका...

गजरा


जिथे माळला तिथे दिसे हा खुलून गजरा
कधी कुंतली, कधी मनगटी सजून गजरा

जरी रात्रभर फुलून गेला थकून गजरा
तनू गंधिता करून गेला पिचून गजरा

इथे इंगळी मदनज्वराची डसे जिवाला
तिथे आग पेटवून गेला निजून गजरा

जरी ती नको नको म्हणे पण खरे नव्हे ते
जुमानू नको विरोध, जा विस्कटून गजरा

नव्याने तुला पटेल ओळख कळी-कळीची
नव्याने पुन्हा बघून जा उलगडून गजरा

तसा मत्सरी स्वभाव नाही जरी कळ्यांचा
परी स्त्रीसुलभ तपास घेतो कसून गजरा

जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा

असे काय बोललास गुंजारवात त्याला
पहा, भृंग, लाजण्यात गेला गढून गजरा
बेवफाई


गजरा दुज्या कुणाचा,ती वेणीत माळते आहे
कळल्यावर ती कळ काळजास जाळते आहे

बेवफाईचा वास तिच्या येतोय बोलण्याला
तिची आठवण त्याच वासात गंधाळते आहे

घेतल्या कैक तिने बाहुपाशात आणाभाका
आता बोलणेही माझ्याशी ती टाळते आहे

मी अशवस्त होतो,अस्वथ होत आहे
डोळ्यातील पाणी खारे, मगर ढाळते आहे

पुरून पुरावे पुरे,प्रीतीचे पुराण्या माझ्या
नव्याशी नवी वचने,नव्याने पाळते आहे

ही रात्र दिवाणी


कधी अनामिक लहरी येता
जीव जातसे वेडाउनी,
कधी अचानक मेघ येता
मनी येतसे पाऊस सजणी,
ही रात्र दिवाणी.
ही रात्र दिवाणी.
रंगलेली मस्तीत कधी
कधी उदास होऊन विराणी..
स्पर्श कातर करून जाते
ही रात्र दिवाणी.
बेधुन्ध अशी वाऱ्यासवे
मिठीत घेतसे पसरून दिशा,
अन् धुसरल्या गगनासवे,
मंद मन्द्सी वाहतसे निशा..
मग अबोल कोठून् सूर येता ,
आव्हानाची चढे नशा.

प्रकाश दिवे अन् संथ धुके...
कुजुबते ती हलके हलके
ये ना प्रिया असा कोसळोनी.
ही रात्र दिवाणी.
ही रात्र दिवाणी......
रंग चढे भणाणत्या वाऱ्याला
विवस्त्र होऊन ती ये मिलनाला,
मी आभाळाला चुम्बूनी घेतो
ती झुके धरेवर धुन्दावूनी...
ही रात्र दिवाणी.
ही रात्र दिवाणी.

भेट



चांदण्याचा स्पर्श

असे तव भेटिला

भाव तुझे पाहण्या

चंद्रहि तो थांबला

पोर्णिमेच्या दुधापरि

तु ओसंडुन फ़ुलावे

चकोर होवुन तुझ्यासवे

रात्र रात्र फ़िरावे....

रात्र आधी मोजतो


रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो

श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो

ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो

एक ना तारा नभी
आणि चकवा भेटतो

सांगणे होते कुठे?
शब्द ओठी कांपतो

विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो?

सोडले ते घर तिने?
दार उघडे पाहतो!

अठवणीच्या बंद कोशात


मी आणि माझं एकटेपण
अबोल असतो क्षणभर
आठवणींच्या बंद कोषात
अडकलो मी आयुष्यभर

सैल झाले बंध सगळे
धुंदं झाल्या ह्या दिशा
आठवणींच्या बंद कोषात
विरून गेल्या माझ्या आशा

काढू कुणासाठी आसवे ही?
जाऊ कुठे नकळे मला
आठवणींच्या बंद कोषात
प्रवास माझा संपला

प्रेम केले होतो कधी मी
अर्थ तुला ना कळला कधी
आठवणींच्या बंद कोषात
शोधतो माझ्या चुकाचं मी

आप्त झाले शत्रू सारे
आयुष्य हे वेडावले
आठवणींच्या बंद कोषात
थेंबही वाळून गेले

नाती ही मनांमनांतली
कळली ना तुला कधी
आठवणींच्या बंद कोषात
शोधतो मलाच मी

शून्य झाले आयुष्यसारे
थांबली आसवे ही
आठवणींच्या बंद कोषात
संपलो माझ्यात मी


शोध


थकल्यावरती सहज शिराया कूस शोधतो आहे
एकाकी चालुन थकलो, जूलूस शोधतो आहे


गर्दी भाडोत्री मिळते, जयघोष टेप केलेला
सुखसोयींनी युक्त असा मी क्रूस शोधतो आहे


आयुष्याच्या प्रखर उन्हाने रोज काहिली होते
आभासी का होईना, पाऊस शोधतो आहे


प्रेयस, श्रेयस, राजस, तामस - रूप कोणते घ्यावे ?
ज्यात स्वत:ला ओतावे ती मूस शोधतो आहे


मुलगा, भाऊ, नवरा, बाबा, सर्व लेबलांखाली
घुसमटलेला, दडलेला माणूस शोधतो आहे


व्यर्थ गीत


व्यर्थ या गीतात माझ्या
व्यर्थ तू गुंतून जावे
अन अशा या सांजवेळी
व्यर्थ मी व्याकूळ व्हावे

व्यर्थ माझे सूर हे अन
व्यर्थ सारया भावना या
गीत कंठातील माझ्या
वाहुनी जाइल वाया

व्यर्थ या शब्दांस माझ्या
ओढ नाही चांदण्यांची
व्यर्थ या माझ्या स्वरांना
साथ ओल्या पापण्यांची

व्यर्थ वारे वाहणारे
व्यर्थ हे आहेत तारे
तू जिथे नाहीस तेथे
व्यर्थ सारे व्यर्थ सारे

व्यर्थ या गीतांत वेड्या
वेचला मी जन्म सारा
व्यर्थ आता सांत्वनाला
कोरडा आला किनारा

व्यर्थ हा आक्रोश माझा
तू पुन्हा यावे म्हणुनी
जीवनाच्या पायथ्याशी
व्यर्थ गावे स्पंदनांनी

व्यर्थ या मातीत आता
प्रीत माझी पाझरावी
जीव हा माझा जळावा
अन तुला गीते स्मरावी?

व्यर्थ माझ्या इंद्रियांनी
शेवटी संन्यास घ्यावा
व्यर्थ सारया जीवनाला
अन निराळा अर्थ द्यावा.