विचार
'कुणासही कधी न घाबरायचा'
करायचा विचार, आवरायचा
विचार आज लागतो करायला
विचार काय नेमका करायचा?
जळून थोटके धुरास पाहती
असाच वेळ शेवटी सरायचा
तुझ्यामुळे जगायचा कुणी कधी
तुझ्यावरी जरा जरा मरायचा
कधीच ना खरा तुझा निघायचा
तरी मनात आकडा धरायचा
जरी तुफान वेग सत्य घेतसे
लगाम कल्पनेत सावरायचा
जिथे निघायचो तिथे निघायचा
जमाव प्रश्न घेत वावरायचा
कशास यायचे कशास जायचे
विचार एवढाच पोखरायचा
जगायची इथेच नोकरी करू
पगार घेत वेळ हा भरायचा
No comments:
Post a Comment