19 May, 2010

श्रावण


काही बोलता, न बोलता, मुक्यानेच गेला श्रावण
घननीळा बरसला, ना बरसला, कोरड्यानेच गेला श्रावण
अबोलीची फुले हलक्याने, उगीचच, माळून गेला श्रावण
काहीनाही तरी दबलासा, ओझरता, रडून गेला श्रावण

निःश्वासासकट उरात, स्वप्ने, दबून गेला श्रावण
भावनांच्या गुंत्याला ओठामागे, दडवून गेला श्रावण
निःशब्द, हलका, डोळ्यावाटे, पाझरून गेला श्रावण
कोणा न कळता, पापणीआड, लपून गेला श्रावण

का उगाच भलती आशा, दाखवून गेला श्रावण
का निराशेच्या हिंदोळ्यांवर, झोकून गेला श्रावण
नेहमीसारखाच काही न देता, रडवून गेला श्रावण
कितीक मोत्यांना मातीमोल, करून गेला श्रावण

शुन्यातूनच येऊन, शुन्यात, हरवून गेला श्रावण
काहीसा माझ्यावर आणि स्वतःवर रुसून गेला श्रावण

No comments: